मे महिन्याचा उत्तरार्ध संपुर्ण देशाला तापत्या वातावरणाचे चटके देत आहेत. राजस्थानमधील बाडनेरचा पारा ५८ अंश सेल्सिअसपर्यंत चढला होता. इकडे उन्हाळ्यात तप्त वातावरण असलेल्या विदर्भात यापेक्षा बरी स्थिती असली तरी महाराष्ट्र राज्यात एप्रील, मे महिन्यात रखरखतं वातावरण राहत असलेल्या विदर्भातही ऊन्हाची काहीली सुरूच असल्याचे दिसले.
अकोला : सलग तीन दिवस ४५ °c
विदर्भातील व अमरावती महसुल विभागातील प्रमुख शहर असलेल्या अकोला जिल्ह्यात मागच्या चार दिवसांपासून उष्णतेची प्रचंड लहर जाणवत आहे. सलग तीन दिवस तापमान ४५ अंश सेल्सिअस राहिले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून उष्णतेच्या झळा सोसून सामान्यजन असह्य झाले आहेत.
जिल्हाधिकार्यांचे आदेश : कलम १४४ लागू
अकोला येथे ४५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेल्याने व हवामान खात्याच्या नागपूर विभागाने आगामी काही दिवस स्थिती अशीच राहणार असल्याचे सुतोवाच केल्याने अकोला जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात कलम १४४ लागू केले आहे.
काय आहेत निर्देश
आपत्कालीन स्थितीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांना कलम १४४ लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. यानुसार अकोला येथे दिनांक २५ ते ३० मे दरम्यान हे लागू राहणार आहे. यामुळे अंगमेहनतीची कामे करता येणार नाहीत. अशा अस्थापनावर हे निर्बंध राहतील. शिकवण्या सकाळी दहापुर्वी व सायंकाळी पाचनंतर घेता येतील. विविध अस्थापनांना सकाळी १० ते ५ आपल्याकडे कार्यरत व्यक्तीसाठी उष्णता कमी करणार्या उपाययोजना करणे सक्तीचे असेल.