Sachin Tendulkar : विनेश फोगटकडून चूक झाली, पण तरीही तिला रौप्यपदक का मिळायला हवं, याबाबतचं सर्वात मोठं कारण हे आता भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरने सांगितले आहे.
पॅरिस : विनेश फोगटवर नामुष्कीची वेळ ओढवली. फक्त १०० ग्रॅम वजन जास्त ठेवल्यामुळे तिला सुवर्णपदक पटकावता येणार नाही. पण विनेशला रौप्यपदक का मिळायला हवं, याचं सर्वात मोठं कारण सचिनने सांगितले आहे.
सचिनने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ” प्रत्येक खेळाचे काही नियम असतात आणि ते त्यानुसारच खेळले जातात. विनेश पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचली. पण अंतिम फेरीपूर्वी जेव्हा वजन करण्यात आले तेव्हा ती अपात्र ठरली. खरं पाहायला गेलं तर ती रौप्यपदकाची हकदार आहे. पण हीच गोष्ट तिच्याकडून हीरावून घेण्याचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे.”
सचिन पुढे म्हणाला की, ” विनेशने जर कोणती अनैतिक गोष्ट केली असती आणि तिला अपात्र ठरवले असते, तर ती वेगळी गोष्ट होती. विनेशने उत्तेजक द्रव्याचे तर सेवन केला नाही. जर तसे घडले असते तर तिला कोणतेही पदक दिले नसते आणि तिला अखेरचा क्रमांक देण्यात आला असता, तर ती गोष्ट योग्य होती. विनेश अंतिम फेरीत पोहोचली ती विजय मिळवूनच. विनेशने तिच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंना पराभूत केले आणि त्यामुळेच ती अंतिम फेरीत पोहोचली. त्यामुळ विनेशला रौप्यपदक मिळायला हवे.”
सचिन या ट्विटमध्ये अजून पुढे म्हणाला की, ” विनेशचे प्रकरण आता क्रीडा लवादाकडे सोपवण्यात आले आहे आणि याबाबतचा निर्णय लवकरच होणार आहे. विनेश ज्या गोष्टीची हकदार आहे ती गोष्ट तिला मिळायला हवी, यासाठी आपण तिच्यासाठी प्रार्थना करू या आणि चांगलाच निर्णय समोर येईल, अशी आशा करूया.” सचिनने मांडलेला मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. कारण जर विनेशने काही अनैतिक गोष्टी केल्या असत्या तर तिच्यावर अशी कारवाई करणे योग्य होते. पण ती एकामागून एक सामने जिंकून अंतिम फेरीत पोहोचली आहे. त्यामुळे तिला रौप्यपदक मिळायला हवे.
सचिनने आपल्या ट्विटमध्ये बरेच महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. एक खेळाडू म्हणून सचिनने यावेळी विनेशला पाठिंबा दिल्याचे समोर आले आहे.