रत्नागिरी: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून असणारा उमेदवार हा धनुष्यबाणावर की कमळावर निवडणूक लढवणार, याबाबत संभ्रम कायम असतानाच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा उमेदवार हा धनुष्यबाणाच्या निशाणीवर लढणारा, असेल असा मोठा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. शिवसेना या मतदारसंघासाठी ठाम असल्याचे ही त्यांनी सांगितल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वीच रत्नागिरी दौऱ्यावर आलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ही सांगितलं की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा उमेदवार कमळावर असेल. त्यामुळे शिंदे शिवसेना आणि भाजप यामध्ये नेमका हा मतदारसंघांमधील उमेदवार कोण याबाबत प्रतिष्ठेचा प्रश्न बनला असून धनुष्यबाण की कमळ याबाबत आता अनेकांना उत्सुकता आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बैठका सभा कार्यक्रम यापूर्वीच सुरू केले आहेत.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा उमेदवार हा धनुष्यबाणावर निवडून येईल. दरम्यान महायुतीच्या उमेदवाराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेते ठरवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. येत्या एक-दोन दिवसात याबाबत उमेदवार जाहीर होणार असल्याचेही उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. पालघर, नाशिक ठाणे, साउथ मुंबई आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागांवर चर्चा सुरू असून महायुतीतर्फे शिवसेनेने या जागेवर मागणी केली आहे. भाजपनेही या ठिकाणी दावा केलेला आहे. त्यामुळे या सगळ्यांचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे घेणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल तर मोठ्या फरकाने निवडून येण्याचाही विश्वास उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. आज गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा त्यांनी राज्यातील सर्व जनतेला तसेच कोकणातील तमाम जनतेला दिल्या आहेत. गुढीपाडव्याचा सण साजरा करत असताना आचारसंहिता ही लागलेली आहे. पण पुढच्या गुढीपाडव्याला देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे असतील असेही त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीमध्ये सांगलीसह संपूर्ण देशातच महाविकास आघाडीबद्दल संभ्रम निर्माण झाल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.