Sharad Pawar On Maratha-Dhangar Reservation: शरद पवार यांनी मराठा आणि धनगर आरक्षणाबाबत बोलताना हे प्रश्न सामंजस्याने सोडवण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, राज्य सरकारने याची जबाबदारी घेऊन लोकांनी विश्वासात घेत त्यांचे प्रश्न सोडवावे असंही ते म्हणाले.
बारामती: सध्या मराठा व धनगर आरक्षणासंबंधी संपूर्ण महाराष्ट्रभर वातावरण ढवळून निघाले आहे. यासंबंधी ज्येष्ठ नेते शरद पवारांनी बारामतीत पत्रकार परिषदेत आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले की, असे प्रश्न सामंजस्याने सोडवायचे असतात. तणाव वाढण्याचे काही कारण नाही. आपण सर्व जन जात, धर्म काही असले तरी आपण भारतीय आहोत. सामंजस्य कसे करता येईल. यासंबंधीची भूमिका या क्षेत्राचे नेतृत्व करतात त्यांनी घेतली पाहिजे आणि राज्य सरकारने सुद्धा अशा प्रश्नांना संबंधी लोकांना विश्वासात घेऊन त्याची पूर्तता कशी करता येईल याकडे लक्ष देऊन याची खबरदारी घ्यावी अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवारांनी दिली.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी देताना विचारपूर्वक घ्यावा लागतो. एका दृष्टीने ही लोकशाहीची पद्धत आहे. निर्णय घेण्याच्या पद्धतीमध्ये एकाने कुठेतरी बसून निर्णय घेण्याच्या ऐवजी सगळ्यांचा विचार घेऊन निर्णय घ्यायचा असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचा अभ्यास करणार आहोत. पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील आणि वरिष्ठांची टीम मुलाखती घेत आहेत. तीन पक्ष राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्र येऊन निर्णय घेतील. या तीन पक्षातील एखादी जागा कुठल्या पक्षाने लढवावी. यासंबंधीचा विचार समन्वयाने करावा लागेल. सध्या ती प्रक्रिया चालू आहे. तिन्ही पक्षाचे प्रमुख बसून जागा संबंधी निर्णय घेऊ असेही पवार यावेळी म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. याबाबत बोलताना पवार म्हणाले की, केंद्रीय आयोग निवडणूक दौरा करणार आहे ही चांगली बाब आहे. येथील एकंदरीत स्थिती काय आहे याची पाहणी करेल. ही एक राजकीय पक्षांना संधी असते. त्यांच्या काही सूचना असतील त्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मांडता येतील. दिल्लीला जाऊन सांगण्यापेक्षा ते स्वतः इथे येत असतील तर ही कौतुकास्पद बाब आहे. आणि मी याचं स्वागत करतो.
केजरीवाल अतिशय उत्तम काम करत होते. त्यांची टीम ही चांगली होती. एका विशिष्ट स्थितीमुळे त्यांना तुरुंगामध्ये टाकले गेले. त्यांच्यावरती खोट्या केसेस केल्या गेल्या. शेवटी एखादी व्यक्ती कधी तरी त्या विचाराने जाऊ शकते आणि त्यांनी सांगितलं आणि राजीनामा दिला. त्यांच्या जागी नंतर कोण येणार ही त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब होती. मात्र त्यांनी ज्यांची निवड केली आहे. त्यांचे कामे नेहमीच पाहतो. त्या अतिशय कर्तुत्वान महिला आहेत. अशी महिला दिल्लीचे मुख्यमंत्री होते ही अतिशय चांगली बाब आहे. या आधी ही दोन भगिनींनी दिल्लीचे नेतृत्व केले आहे. आणि दिल्लीच्या प्रशासनाचा दर्जा उंचावला आहे. हीच परंपरा पुढे हे भगिनी चालू ठेवेल याचा मला विश्वास आहे. त्याना मी शुभेच्छा देतो.
काही ठिकाणी नुकसान झाल्याच्या तक्रारी आहेत. राज्य सरकारने काही धोरणे जाहीर करतो म्हणून सांगितले होते. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांच्यापर्यंत काही पोहोचले हा महत्त्वाचा भाग आहे. असा फार मोठा वर्ग आहे. ज्याच्याकडे काहीच पोहोचले नाही. त्यामुळे लोक अस्वस्थ आहेत. आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून काही दुरुस्ती करता येते का यासंबंधी आग्रह करणार असल्याचे पवार म्हणाले