सातारा:- प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र च्या वतीने लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार दिनांक २७ एप्रिल रोजी संभाजी ब्रिगेड सातारा जिल्हा कार्यकारणी बैठक हॉटेल खांडोळी गोडोली येथे पार पडली.
सदर बैठकी मध्ये शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारा जिवंत राहण्यासाठी व संविधान वाचविण्याकरता संभाजी ब्रिगेड सातारा जिल्हा कार्यकारणी यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांना पाठिंबा देण्याचे एकमताने ठरविले. जिल्ह्यातील वाढती बेरोजगारी, महागाई ,गुन्हेगारी या सर्व गोष्टींचा विचार करता आपण महाविकास आघाडीबरोबर राहणे गरजेचे आहे असे यावेळी सांगण्यात आले. सदर मीटिंगमध्ये सध्या देशात चाललेल्या राजकारणाचे गंभीर परिणाम सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबावर कसे होतात याबद्दल सुद्धा चर्चा करण्यात आली. जाती धर्मात तेढ निर्माण करून भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असणारी समता ,बंधुता ही मूल्य पायदळी तुडवण्याचे काम विद्यमान केंद्र व राज्य सरकारकडून होत आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्यकारिणी यांनी या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करत सातारा जिल्हा महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना पाठिंबा देण्याचे ठरवले. व त्यांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून आणण्यासाठी संभाजी ब्रिगेड सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते तन मन धनाने काम करतील असा निर्धार यावेळी करण्यात आला.
सदर बैठकीस शशिकांत शिंदे यांच्या वतीने प्रदीप शिंदे उपस्थित होते तसेच संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक प्रदिप कणसे, सहसंघटक अनिल जाधव , पुणे विभाग अध्यक्ष हर्षवर्धन मगदूम, जिल्हाध्यक्ष शिवम कदम , जिल्हा कार्याध्यक्ष सुमित भोसले,सातारा शहराध्यक्ष अनिकेत मोरे ,पाटण तालुकाध्यक्ष नितीन भिसे , कराड शहराध्यक्ष भूषण पाटील, जावळी तालुकाध्यक्ष दिगंबर मोरे, कराड उत्तर विधानसभा अध्यक्ष निलेश शिंदे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.