Pune Crime : गोपीनाथ मार्केट यार्डात हमाली करीत होते. त्यांना मधुमेहाचा आणि मणक्याच्या आजाराचा त्रास होता. राणीने २३ सप्टेंबरला गोपीनाथचा भाऊ संभाजीला फोन करून गोपीनाथ घरात बेशुद्धावस्थेत पडल्याचे सांगितले.
पुणे : अनैतिक संबंधांतील अडथळा दूर करण्याच्या उद्देशाने महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा दाबून खून केला. पतीने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा बनाव महिलेने रचला. मात्र, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर महिलेने केलेल्या खुनाचे सत्य समोर आले आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली.
काय आहे प्रकरण?
गोपीनाथ इंगुळकर (वय ३७, रा. दुगड शाळेजवळ, सच्चाई माता मंदिराजवळ, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी राणी इंगुळकर (वय ३२, रा. कात्रज) आणि नितीन ठाकर (४५, रा. वेल्हे) यांना अटक केली आहे. नितीन राणीचा नातेवाइकच असून, तो खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतो. या प्रकरणी मृताचा भाऊ संभाजी इंगुळकर (४४, रा. वृंदावन कॉलनी, कात्रज) यांनी तक्रार दिली आहे. गोपीनाथ मार्केट यार्डात हमाली करीत होते. त्यांना मधुमेहाचा आणि मणक्याच्या आजाराचा त्रास होता. राणीने २३ सप्टेंबरला गोपीनाथचा भाऊ संभाजीला फोन करून गोपीनाथ घरात बेशुद्धावस्थेत पडल्याचे सांगितले. गोपीनाथ यांनी आजाराला कंटाळून स्वतःचा गळा दाबून आत्महत्येचा प्रयत्न केला, अशी माहिती राणीने संभाजी यांना दिली.
शवविच्छेदनात सत्य समोर
संभाजी यांनी गोपीनाथ यांना रुग्णालयात दाखल केले . तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ससून रुग्णालयात शवविच्छेदनात गोपीनाथ यांचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी राणीकडे चौकशी केली, तेव्हा ‘त्यांनी माझा हात हातात घेऊन स्वतःचा गळा दाबून घेऊन आत्महत्या केली ,’ असे राणीने सांगितले. मात्र, अधिक चौकशी केली असता, राणीने प्रियकराला घरी बोलावून पतीचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली .
लहान मुलीसमोरच केला खून
गोपीनाथचा यांचा खून झाला, तेव्हा त्यांची दहा वर्षांची मुलगी घरीच होती. घडल्या प्रकारामुळे ती खूप घाबरली होती. गोपीनाथचा गळा दाबत असताना ती घाबरून स्वयंपाकघरात लपून बसली होती.