कळंब : महावितरण अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे कळंब शहरातील ढोकी रोड परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मागील 18 तासांपासून ढोकी रोड वरील पुनर्वसन सावरगाव भागातील नागरिक मच्छर आणी उकाड्याने त्रस्त असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. दिनांक 21 मे रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास रोहित्र जळल्याने नागरिक रात्रभर उकाड्याने त्रस्त होते दिनांक 22 रोजी महावितरण कडून नवीन रोहित्र बसवण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता पण हा आनंद अवघे दहा मिनिटे टिकला नवीन रोहित्र जळाल्याने आज पुन्हा पुनर्वसन सावरगाव चा काही भाग पुन्हा अंधारात सापडला आहे. यामुळे महावितरण विभागाच्या विरोधात नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीही पसरली आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत सुरू ठेवणे गरजेचे आहे. पण महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे वीज वारंवार खंडित होत असल्याचे प्रकार घडत आहेत. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घडत असलेला प्रकार त्वरित न थांबवल्यास नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहराच्या इतर भागातही वीज वारंवार बंद होत असल्याने नागरिकांना विद्युत उपकरणे बंद ठेवावी लागत आहेत. पिण्याचे पाणी मिळणेही मुश्कील झाले आहे. तसेच वेगवेगळे उद्योग असणाऱ्या दुकानदार व व्यावसायिकांचीही अडचण झाली आहे. एकूणच, सर्व कामकाजावर विपरीत परिणाम होत आहेत. अशा गंभीर मुद्द्याकडे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मात्र दुर्लक्ष होत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.