प्रतिनिधी
भक्ती अन् भाव यांचा मिलाफ असलेली पंढरपुरची वारी, वारकर्यांसाठी मोठ्या श्रद्धेची असते. आषाढी, कार्तिकी एकादशीच्या वारीसह दर एकाशीला पंढरपूर गाठत विठ्ठल चरणी लीन होण्यात वारकरी धन्यता मानतात.
उद्या अशीच श्रावण एकादशी. त्यातही श्रावण महिन्यातील या एकादशीला पंढरी तीर्थस्थळं गाठत विठ्ठल रूक्मिनी यांचे दर्शन घेण्यासाठी अनेकांची पावले पंढरपुरी मार्गस्थ होतात. यासाठी अनेकांचा एसटीच्या लालपरीचा प्रवास ठरलेला असतो.
मात्र, गुरुवारी रात्री भगवंत भेटीसाठी पंढरीला जाण्यासाठी कळंब बस स्थानकात दाखल झालेल्या असंख्य वारकर्यांची मोठी गैरसोय झाली. कळंब आगाराच्या ढिसाळ नियोजनामुळे गाडी लागत नसल्याने तासनतास बसस्थानक ताटकळत बसावे लागले.
वयस्क वारकर्यांची फजिती…
कळंब आगारात सायंकाळी सहानंतर अनेक प्रवासी पंढरपूरकडे जाणार्या बसच्या प्रतिक्षेत होते. थेट गाडी तर लागत नव्हती, शिवाय त्यांना कळंब ते बार्शी, कुर्डूवाडी अशा टप्प्याटप्प्याने प्रवास करणारी गाडी पण उपलब्ध होत नव्हती. यामुळे तब्बल दोन अडीच तास वारकरी संप्रदायातील अनेक भावीक भक्तांना कळंब आगारात ताटकळत बसावे लागले.
आगारातून स्थानकात, स्थानकातून आगारात…
शुक्रवारी श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी. यानिमित्तानं पंढरपुरी विठ्ठल दर्शनासाठी जात असलेल्या प्रवाशांमा गाडी लागत नसल्याने स्थानकाच्या आवारातून बस आगाराकडे तर आगारातून बसस्थानकाकडे हेलपाटे मारावे लागत होते. त्यांची ही विवंचना अनेकांच्या संवेदनशील मनाला चीड आणणारी होती. असे असतानाही आगार व्यवस्थापनाला याचे काही सोयरसुतक नव्हते.