Kolhapur Congress Leader Death : महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि संभाजी राजे छत्रपती यांनी पार्थिवाचे दर्शन घेत अनेक आठवणींना उजाळा दिला, तर आपल्या लाडक्या नेत्याचं पार्थिव पाहून कार्यकर्त्यांनाही शोक अनावर झाला
कोल्हापूर : प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि कोल्हापुराती करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी एन पाटील यांचे निधन झाले. रविवारी घरात पाय घसरून पडल्याने त्यांच्या मेंदूला मोठी दुखापत झाली होती. कोल्हापुरातील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली, मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. अखेर उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि संभाजी राजे छत्रपती यांनी पार्थिवाचे दर्शन घेत अनेक आठवणींना उजाळा दिला, तर आपल्या लाडक्या नेत्याचं पार्थिव पाहून कार्यकर्त्यांनाही शोक अनावर झाला.
काँग्रेस आमदार पी एन पाटील यांचे गुरुवारी पहाटेच्या सुमारास रुग्णालयात निधन झाले. सकाळच्या सुमारास त्यांचे पार्थिव रुग्णालयातून रवाना करण्यात आले. यावेळी त्यांच्या समर्थकांच्या भावनांचा बांध फुटला. आपल्या नेत्याचे पार्थिव पाहून कार्यकर्त्यांनी अक्षरशः टाहो फोडला. त्यानंतर पीएन पाटील यांचे पार्थिव निवासस्थानी दाखल झाले. यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, संभाजी राजे छत्रपती, भाजप नेते आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
कोल्हापूर लोकसभेला काँग्रेसकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात असल्याने आमदार पी. एन. पाटील यांनी करवीर मतदारसंघासह जिल्ह्यात झंझावाती प्रचार केला होता. लोकसभेला सहा विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक 80 टक्के मतदान करवीरमध्ये झाले होते. करवीर विधानसभा मतदारसंघातून पी. एन. पाटील आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी मतदारसंघातील प्रचाराची धुरा एकहाती सांभाळली होती.