Mahayuti : शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावरुन महायुतीमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. “ज्यांना आम्ही जवळ असल्याने उलट्या होतात, अशा ठिकाणी आम्ही थांबणं कार्यकर्त्यांना, महाराष्ट्रातील जनतेला आवडणार नाही” असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्त्याने म्हटलं आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि राज्य सरकारमधील मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल एक वक्तव्य केलं. त्यावरुन आता मोठा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्त उमेश पाटील यांनी सत्ता गेली चुलीत अशा पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “तानाजी सावंतांनी असं बोलणं म्हणजे आम्ही सत्तेसाठी लाचार झालो आहोत, असं लोक म्हणतील. ज्यांना आम्ही जवळ असल्याने उलट्या होतात, अशा ठिकाणी आम्ही थांबणं कार्यकर्त्यांना, महाराष्ट्रातील जनतेला आवडणार नाही” असं उमेश पाटील म्हणाले. “महाराष्ट्राची, मराठी मनाची एक अस्मिता आहे. तानाजी सावंत यांनी असंस्कृत विधान केलं. अशा वक्तव्यामुळे उद्या राजकारण्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल. लोकांना वाटेल राजकारणी लोक काय बोलतात, इतके घाणेरडे लोक असतील, तर राजकारणात जायला नको असं लोक बोलतील.” असं उमेश पाटील म्हणाले.“उद्या हाऊसिंग सोसायट्यांमध्ये बोर्ड लावतील राजकारणी लोकांना घर मिळणार नाही. अशा वातावरण आम्हाला राहू वाटत नाही” असं उमेश पाटील म्हणाले. अजितपवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे तिन्ही नेते महायुती एकत्र असल्याच दाखवतात, या प्रश्नावरही उमेश पाटील यांनी उत्तर दिलं. “महायुतीसाठी हे किती घातक आहे, यावर मी आता बोलणार नाही. माझी विनंती आहे, तानाजी सावंतांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होत नाही, तो पर्यंत आमच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला जाऊ नये. जर, मुख्यमंत्री कारवाई करणार नसतील, आम्ही सरकारमधून बाहेर पडावं अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. अजून नेत्यांच्या स्तरावर बैठक झालेली नाही. वरिष्ठ स्तरावरुन आम्हाला सूचना मिळालेली नाही. स्थापनेपासून राष्ट्रवादीमध्ये आमच योगदान आहे. तपश्चर्या आहे. आमच्या नेत्याबद्दल असं वक्तव्य ऐकून घेऊ शकत नाही” असं उमेश पाटील म्हणाले.
‘असं ऐकून घेण्यापेक्षा सत्ता गेली चुलीत’
अजित पवारांकडून प्रतिक्रिया आलेली नाही, यावर उमेश पाटील म्हणाले की, “मी मुख्य प्रवक्ता आहे. कार्यकर्त्यांच्या भावना समजतात. पक्षाने मुख्य प्रवक्ता म्हणून जबाबदारी दिलीय. तेवढा मला सेन्स आहे. अशा स्टेटमेंटवर कशी प्रतिक्रिया असावी ते कळतं” “असं ऐकून घेण्यापेक्षा सत्ता गेली चुलीत. त्यापेक्षा घरी बसलेलं बर अशी आमची भावना आहे. अजित पवार एक कणखर माणूस आहे. महाराष्ट्रात पवार कुटुंबाच एक वेगळं अस्तित्व आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंतांना स्थान देऊन मंत्रिमंडळाचा दर्जा घालवला. आमचा नेता छोटा नाही, एवढं ऐकून घेऊन गप्प बसू” अशा शब्दात उमेश पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला.