शब्दांकन:- एल. डी पाटील (लोकसंवाद वृत्त विशेष)
“गेले ते दिवस, होऊन गेले ते लोकप्रतिनिधी” 5 सप्टेंबर 2024 रोजी मा. नानासाहेब विजय नवल पाटील माजी केंद्रीय मंत्री वयाची 82 वर्षे पूर्ण करून 83 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने शिक्षण महर्षी मा. नानासाहेबांना हार्दिक शुभेच्छा व पुढील आयुष्यात त्यांना निरोगी आयुष्य लाभो अशी परमेश्वराला प्रार्थना करू या. यापूर्वीही मा. नानासाहेबांच्या आयुष्यावर अनेकांनी लिहिले आहे, मी सुद्धा यापूर्वी लिहिले आहे. परंतु सध्या निवडणुकीचा काळ सुरू झाला आहे
व सध्याचे राजकारणाची अवस्था बघून लोकप्रतिनिधींनी कुठे नेऊन ठेवला ''
महाराष्ट्र माझा''
असे शब्द अनेकांच्या तोंडून निघत आहेत. त्यात वास्तविकता आहे.
यानिमित्ताने मला 40 - 45 वर्षांपूर्वीचे लोकप्रतिनिधी, त्यांचे कार्य, जनतेशी त्यांचा संवाद, कामाची पद्धत, मतदार संघाच्या जनतेशी त्यांची नाड, कटिबद्धता बाबतच्या लोकप्रतिनिधींमध्ये मा. नानासाहेबांचा निश्चितच समावेश होतो. म्हणून हे दोन शब्द. 1977 चा लोकसभा निवडणुकीत नशीब बलवत्तर म्हणून म्हणा किंवा मा. नानासाहेबांचे वडील खानदेश चे गांधी स्व. नवल भाऊ व आमचे मावशे व नानासाहेबांचे सासरे कै. रामचंद्र दादां (नागदकर) ची पुण्याई म्हणून नानासाहेबांना धुळे लोकसभा मतदारसंघातून कमी वयात काँग्रेस तर्फे खासदारकीचे तिकीट मिळाले. तिकीट मिळण्यासाठी माननीय नानासाहेबांच्या सुविद्य पत्नी सौ. शिला ताईंच्या पायगुणाचाही येथे आवर्जून उल्लेख केला पाहिजे. ताईंच्या पायगुणामुळेच माननीय नानासाहेबांच्या आयुष्यातील राजकारण व समाजकारण या दोन्ही ठिकाणी नानासाहेबांना घवघवीत यश मिळत गेले, ही वस्तुस्थिती आहे .त्या वेळच्या अखंडित धुळे जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांना नाना साहेबांना तिकीट मिळाल्यानंतर आश्चर्य वाटले. परंतु तरीही त्यांनी पूर्ण क्षमतेने ताकद लावून मा. नानासाहेबांना लाखोंच्या मताधिक्याने निवडूनही आणले. स्व. व्यंकटराव अण्णा रणधीर, स्व. शिवाजीराव दादा पाटील, स्व. पितांबर जिभाऊ, स्व. जी. टी. बापूजी या नेत्यांचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख करता येईल. स्व. रुख्मिणीताई व स्व. नवलभाऊ या स्वातंत्र्य सैनिक असलेल्या आई-वडिलांचाही विशेष उल्लेख करतो. कारण या दोघांचा आदर करणारी त्यांच्या समवेत कारागृहात राहिलल अनेक स्वातंत्र्य सैनिक व त्यांचा परिवार धुळे मतदार संघात होता. या सर्वांशी या उभयतांनी प्रचाराच्या निमित्ताने संपर्क साधला होता. त्यामुळे पूर्ण देशात प्रतिकूल परिस्थिती असतानाही मान्य नानासाहेब लाखांच्या मताधिक्याने धुळे मतदार संघातून निवडून आले. माननीय नानासाहेब आपल्याला निवडून दिलेल्या मतदार संघातील जनतेशी निवडणूक प्रामाणिकपणे एकनिष्ठ राहिले. परंतु सप्तशृंगी देवी वनी गडापर्यंत मतदार असलेल्या धुळे मतदार संघाचे प्रतिनिधी मुदतपूर्व निवडणूक झाल्यामुळे व पुढे सन 1980 मध्ये धुळे मतदार संघ राखीव झाल्यामुळे या मतदारसंघाचे नानासाहेबांना पूर्ण पाच वर्ष प्रतिनिधित्व करता आले नाही. परंतु माननीय नानासाहेबांवर पूर्ण विश्वास असलेल्या स्व. इंदिराजी गांधी यांनी ''आपको फिर से चुनाव लढना है'' असे सुचवले. तेव्हा त्यांनी इंदिराजींना, "मॅडम मेरा संसदीय चुनाव क्षेत्र धुलिया आरक्षित हो गया है" असे नम्रपणे सांगितले फिर क्या हुआ? आप महाराष्ट्र का कोई भी संसदीय चुनाव क्षेत्र चुन लिजीए! वहांसे आपको चुनाव लढना है असे इंदिराजींनी सांगितल्यानंतर माननीय नानासाहेबांनी धुळे मतदार संघाला लागून असलेल्या पूर्वीचा एरंडोल मतदार संघाची निवड केली. व हा मतदारसंघ मला निवडणुकीसाठी कसा सोईस्कर आहे, हे स्व. इंदिराजींना व दिल्लीतील इतर वरिष्ठ नेत्यांना पुराव्यानिशी दाखवून दिले. त्यानंतर नानासाहेबांना एरंडोल लोकसभेची उमेदवारी मिळाली. सलग तीन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना नानासाहेबांनी मागे वळून पाहिले नाही. त्या काळात आज आहे असे राजकारण नव्ह्ते. मतदार संघ व तेथील जनतेशी लोकप्रतिनिधी एकनिष्ठ होते. मतदार संघातील जनतेच्या निवेदन / पत्रांवर वेळेवर उत्तरे पाठविली जात होती. त्यांच्या निवेदनावर काय कारवाई केली हे संबंधितांना कळविले जात होते. संबंधित विभागाकडून काय कारवाई झाली हे सुद्धा संबंधितांना कळविण्यात येत होते. माननीय नानासाहेब तेव्हा रेल्वेने जास्त प्रवास करत होते. रेल्वे प्रवासात सोबत असलेल्या कर्मचारी बरोबर पोर्टेबल टाईप राईटर असायचे व त्या तारखेपर्यंत मतदार संघातील नागरिक व इतरांकडून आलेले निवेदने/ अर्जाचे डाक प्याड सोबत असायचे. त्यावर रेल्वे प्रवासातही डाकपॅड मधील आलेले पत्र बघून संबंधितांना त्या ठिकाणाहून तत्परतेने कारवाईसाठी पत्र पाठविले जायचे. नानासाहेबांची काम करण्याची पद्धतच वेगळी होती. एक प्रसंग मला आजही आठवतो. चोपडा सहकारी साखर कारखान्याच्या मंजुरीसाठीचा प्रस्ताव राज्य शासनामार्फत दिल्ली येथे केंद्रीय कृषी मंत्रालयात आलेला होता. त्यावेळी हरियाणाचे स्व. राव वीरेंद्रसिंग हे कृषिमंत्री होते. माननीय नानासाहेबांना आपल्या मतदार संघातील साखर कारखान्यास मंजुरी मिळवून घ्यायची असल्याने केंद्रीय कृषी मंत्री राव वीरेंद्र सिंग यांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. मंत्र्यांच्या दिवसभरातील कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे भेटीची वेळ मिळाली नव्हती. तरीही नानासाहेब त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसले. तेथे कृषी मंत्र्याचे खाजगी सचिव येऊन नानासाहेबांना म्हणू लागले. साहेबांना (कृषीमंत्री ) आज वेळ नाही. त्यांच्या आज मीटिंग आहेत. ते आपल्याला भेटू शकणार नाहीत. नानासाहेबांनी त्यांना नम्रपणे उत्तर दिले की, हरकत नाही. साहेब ऑफिसच्या बाहेर निघाल्यावर चालता चालता मी त्यांच्याशी संवाद साधून घेईल. व तसेच झाले. मंत्री महोदय कार्यालयाच्या बाहेर निघाल्यानंतर नानासाहेब चालता चालता कृषीमंत्र्यासोबत त्यांच्या गाडीपर्यंत बोलत बोलत चालत गेले. काय काम आहे ,याची कृषी मंत्र्यांशी चर्चा केली व ते काम मंजूरही करून घेतले. हे काम होते चोपडा सहकारी साखर कारखाना मंजुरीचे. इतकी जिद्द त्यांच्यामध्ये होती. एक प्रसंग पक्षाशी संबंधित मला आठवतो
स्व.श्री. सिताराम केसरी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते दिल्लीत पक्षांच्या अध्यक्षांच्या भेटीसाठी रोज 100-200 नागरिक कार्यकर्ते भेटीसाठी येत असतात. अशाच एक दिवशी नानासाहेब अध्यक्षांच्या भेटीसांठी त्यांच्या (सिताराम केसरी) बंगल्यावर गेले. व तेथे नागरिकांमध्ये जाऊन बसले. केसरी साहेब बाहेर आले व लोकांना भेटायला लागले. अचानक त्यांचे लक्ष माननीय नानासाहेबांकडे गेले. केसरी साहेब तेथून सरळ नानासाहेबां जवळ आले व नानासाहेबांची गळाभेट घेतली. तेथे उपस्थित असलेले सर्व लोक आश्चर्याने बघत राहिले. केसरी साहेब सर्व नागरिक/ कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले, “ये विजय पाटील हमारे (पक्षाचे) बुरे वक्त का सच्चा (इमानदार ) साथी है” असे म्हणून नानासाहेबांची पाठ थोपटली. लोकप्रतिनिधी असावा, तर असा एकनिष्ठ असावा.
दिल्लीत मराठी भाषेत कार्यालयीन काम करणाऱ्या मराठी तरुणांची कमतरता असते. या संदर्भातील एक प्रसंग मला आठवतो. महाराष्ट्र शासनाच्या कार्यालयात मराठी भाषेत कार्यालयीन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांना आवश्यकता भासली. त्यावेळी मराठी तरुण शक्य तितक्या लवकर कसा उपलब्ध होईल, अशी चर्चा अधिकारींमध्ये सुरू झाली. उपस्थित अधिकारींपैकी महाराष्ट्र शासनाचे त्या वेळेचे जनसंपर्क अधिकारी स्व. एस. जी. जोशींनी त्वरित उत्तर दिले की, श्री. विजय नवल पाटील यांच्या कार्यालयाशी संपर्क साधा. त्यांच्याकडे पात्रता असलेला कर्मचारी त्वरित मिळू शकतो संबंधित अधिकारींनी नानासाहेबांच्या कार्यालयात संपर्क साधला व त्यांना त्याच दिवशी त्यांना आवश्यक असलेला कर्मचारी मिळालाही. तो कर्मचारी होता चोपडा येथील कायम रहिवासी असलेला शामसुंदर गोविंद वैद्य अशा पद्धतीने वैद्यांना दिल्लीतील शासकीय कार्यालयात कायमस्वरूपी शासकीय नोकरीही मिळाली असे दिल्लीतील अनेक उदाहरणे सांगता येतील. माननीय नानासाहेबांच्या सहवासातील गेले 45 वर्षातील अनेक अनुभव लिहिता येतील. सध्या असलेली कर्नाटक एक्सप्रेसचा रूट नवी दिल्ली- इटारसी - नागपूर - बंगलोर असा होता. त्या काळात नानासाहेबांच्या एरंडोल मतदार संघातून दक्षिण भारतात जायला एकही रेल्वे नव्हती. नानासाहेबांनी त्यावेळच्या रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करून या रेल्वेचा मार्गच वळवून आपल्या मतदारसंघातून नवी दिल्ली- इटारसी - भोपाळ - भुसावळ - जळगाव - चाळीसगाव मार्गे पुढे बंगलोर पर्यंत करून घेतला. आजही ही रेल्वे या मार्गावर निरंतर सुरू आहे .त्या काळात अशी कामे करताना लोकप्रतिनिधींमध्ये जिद्द असावी लागते ती नानासाहेबांकडे होती. असाच एक प्रसंग आठवतो. पाचोरा तालुक्यात एका गावात जिल्हा परिषद मार्फत पाणी अडविण्यासाठी बंधारा मंजूर करण्यात आला होता. परंतु जेथे बंधारा होणार होता, त्या परिसरात सुपीक जमीन होती. ही सुपीक जमीन बंधाऱ्याच्या पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे मोठे जमिनीचे नुकसान होणार असल्यामुळे तेथील शेतकऱ्यांचा त्या बंधार्यास विरोध होता. त्या गावांचे खासदार नानासाहेब होते. योगायोगाने काही कार्यक्रमानिमित्त त्या वेळचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व बांधकाम समितीचे सभापती स्व. श्री. अख्तर अली काझी साहेब त्या गावात आले. नागरिकांनी त्यांच्यासमोर हा विषय मांडला. व हा बंधारा होऊ नये म्हणून त्यांना विनंती केली. व आपण याबाबत निर्णय घेतला नाही तर आम्ही आमचे खासदार माननीय नानासाहेबांकडे जाऊ, असे तेथे जमलेल्या नागरिकांनी पूर्ण आत्मविश्वासाने अख्तर अली काझी साहेबांना सांगितले. काझी साहेबांनीही तितक्याच तत्परतेने गावकऱ्यांना उत्तर दिले की, *"हाॅ मुझे अच्छी तरह मालूम है की, यह गांव विजय नाना का दत्तक गाव है , " अगर आपका खेती का नुकसान होता है और आप लोग वहा बंधारा नही चाहते है तो वहा बंधारा नही होगा ! नही होगा ! तेथेच त्यांनी घोषणा केली. लोकांमध्ये आनंद ओसंडू लागला. घोषणेप्रमाणे त्या ठिकाणी बंधारा झाला नाही. सांगायचे एवढेच आहे की, त्या वेळच्या लोकप्रतिनिधी विषयी लोकांमध्ये इतका दृढ विश्वास होता. लोकप्रतिनिधींमध्ये एकमेकांविषयी इतके प्रेम व आदर होता तूर्त एव
ढंच