शरद पवारांनी आम्हाला पाठिंबा दिला नाही तर आम्ही राज्यभर लाक्षणिक उपोषण करू आणि आमचे पहिले उपोषण हे शरद पवार यांच्या घरापासून असेल, असा इशारा सकल मराठा समाजाकडून देण्यात आला.
नाशिक : शरद पवारांनी पक्ष फुटल्यानंतर महाविकास आघाडीचे जसे नेतृत्व केले, तसे मराठा आरक्षणासाठी आपण सर्व पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या नेत्यांना सोबत घ्यावे. अंतरवाली सराटी या ठिकाणी जाऊन महाराष्ट्राला मार्गदर्शन करावे. शरद पवार यांनी जर आमच्या आरक्षणासाठी पुढाकार घेऊन मार्ग सोडवला तर आम्ही सर्व मराठा समाज आपल्यासोबत राजकीयदृष्ट्या सक्रिय राहू. आम्हाला जर आपण पाठिंबा देणार नसेल तर आम्ही राज्यभर लाक्षणिक उपोषण करू आणि आमचे पहिले उपोषण हे शरद पवार यांच्या घरापासून असेल, असा इशारा सकल मराठा समाजाकडून देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आंदोलकांना नोटीस धाडली आहे. याबाबत सकल मराठा समाजाचे समन्वयक करण गायकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
करण गायकर म्हणाले की, मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसल्यानंतर आम्ही सर्व राजकीय पक्षांना आव्हान केले होते की, तुमची मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा. तसेच शरद पवार यांनी सर्व राजकीय पक्षांना एकत्रित आणून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. मराठा आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांची भूमिका स्पष्ट करावी. याबाबत आम्ही पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेतली. मनोज जरांगे यांची मनधरणी करून एक महिन्याचा कालावधी सरकारने मागितला आहे.
…तर आंदोलन करणारच
तरी देखील मुंबई पोलिसांनी आम्हाला नोटीस बजावली आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करू नये म्हणून इशारा देण्यात आला आहे. त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. कितीही नोटीसा दिल्या तरी आंदोलनापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही. संविधानिक पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहोत. चार ते पाच दिवसात शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. महाविकास आघाडीची मोट बांधून लोकसभा निवडणुकीत जसा विजय मिळवला, तसाच मराठा समाजाला न्याय देण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात. मागण्या मान्य झाल्या नाहीतर आंदोलन करणारच, असा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे.