अचानक तब्बेत खालावल्यामुळे मनोज जरांगे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने गाठीभेटी दौऱ्यात बीड जिल्ह्याचा दौरा सुरू असतानाच अचानक त्यांची तब्येत खालावली.
छत्रपती संभाजीनगर – राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून राजकीय नेतेमंडळी प्रचारात व्यक्त आहेत. तर, मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे निवडणुकांच्या राजकारणापासून दूर आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होताच, ते आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या गाठीभेटी आणि दौरे सुरू असून बीड जिल्ह्यात त्यांनी लक्ष केंद्रीत केलं आहे. आजही बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली. त्यामुळे, त्यांन तत्काळ बीडमधून छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आलं आहे.