Manoj Jarange Call Dhananjay Munde , जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी आज (दि.4) अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली
Manoj Jarange Call Dhananjay Munde , जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी आज (दि.4) अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातल्या बाणेगाव येथे पाहणी करताना मनोज जरांगे यांनी थेट कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनाच फोन लावला. यावेळी शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची विनंती मनोज जरांगे यांनी त्यांना केली. दरम्यान सरसकट शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिल्याचे देखील मनोज जरांगे यांनी यावेळी म्हटलं. मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) घनसावंगीमध्ये बोलताना याबाबत भाष्य केलं आहे.
मनोज जरांगे काय काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मला कशात राजकारण करायचं नाही. दुसरा कोणी असता तर त्यांना डायरेक्ट बोलला असता. मला कोणत्याही गोष्टीत राजकारण करायचं नाही. सध्या धनंजय मुंडे (Dhananjay Munde) कृषीमंत्री आहेत. त्यांनी सध्या एक शब्द वापरलाय. आम्ही सरसकट नुकसान भरपाई देणार आहोत. म्हणजे पंचनामेही केले जाणार नाही. म्हणजे कोणाची पाईपलाईन वाहून गेली असेल तर पंचनामे होणार आहेत. आम्ही सुद्धा विश्वास ठेवायला तयार आहोत. त्यांनी 10 दिवसांच्या आत नुकसान भरपाई देऊ, असं सांगितलं आहे. नाही दिली भरपाई दिली तर मनोज जरांगे रस्त्यावर उतरेल. त्यांची काळजी नाही, असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं.
आम्हाला आमचा शेतकरी वाचवायचा आहे, जगवायचा आहे
पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, मला प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं नाही. आम्हाला आमचा शेतकरी वाचवायचा आहे, जगवायचा आहे. याच्यामध्ये कोणताही जातीवाद नाही. त्यांचा फोन लागत नाही. आपण त्याचा गैरअर्थ काढला नाही. आपण अर्थ काढला की, ते काहीतरी कामात असतील. प्रत्येक वेळेस राजकारण करायचं आणि आडवं बोलायचं या धंद्यात मी पडत नाही. कामात असले तर 100 टक्के माणूस परत कॉल करतो. त्यांनी माघारी कॉल केला होता. त्यांनी आता शब्द दिलाय. तो शब्द त्यांना पाळावा लागणार आहे. आम्ही शेतकऱ्यांना मदत मिळवणार आहोत. मदत नाही दिली तर राज्यातील शेतकरी मी रस्त्यावर आणेन. यांना जगणे सुद्धा मुश्किल करेन. माझ्या शेतकऱ्याचा जीव चाललाय, असंही मनोज जरांगे पाटील या वेळी बोलताना म्हणाले.