शुभम राखुंडे
भारत जगातील सर्वात मोठा संसदीय लोकशाही असलेला देश. इथं देशाच्या कारभाराची सुत्रं संसदेत प्रतिनिधित्व करणार्या लोकप्रतिनिधीच्या हातात सोपवली जातात. यासाठी मतदार आपला मताधिकार वापरत, आपल्या लोकप्रतिनिधीच्या ‘दिल्लीवारी’वर शिक्कामोर्तब करतात.
यामध्य दर पाच वर्षाला राबवली जाणारी निवडणूक प्रक्रिया महत्वाची ठरते. सध्या लोकशाहीचा हाच उत्सव देशभर सुरू आहे. विविध राज्यात, वेगवेगळ्या टप्प्यात निवडणूक संपन्न होत आहे. यात पहिला, दुसरा टप्पा पूर्णत्वास आल्यानंतर दिनांक ७ मे रोजी तिसरा टप्पा पार पडणार आहे.
तिसर्या टप्पात : राज्यातील नऊ सुभेदारावर शिक्कामोर्तब
▪️ बारामती ▪️ माढा ▪️धाराशिव
▪️सोलापूर सातारा सांगली
▪️रायगड ▪️लातूर ▪️ रत्नागिरी-सिंधुदुर्ग
मंगळवार दिनांक ७ मे रोजी राज्यातील उपरोक्त नऊ लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. यात माजी कृषिमंत्री शरद पवार, त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उदयनराजे भोसले, विजयसिंह मोहिते पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दबंग नेते ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी मंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांच्या स्नुषा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
अशा आहेत थेट लढती
🔸 बारामती : नणंद भावजयीमध्ये विजेता कोण?
ज्येष्ठ नेते शरद पवारांचा अभेद्य राजकीय गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघात त्यांच्या कन्या तथा विद्यमान खासदार सुप्रिया सुळे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्धांगिनी सुनेत्रा पवार या नंणद भावजयीमध्ये थेट लढत होत आहे.
🔸सोलापूर : दोन आमदारात चुरस
सोलापूर मतदारसंघात माजी केंद्रीय गृहमंत्री तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय राम सातपुते यांच्यात थेट लढत होत आहे. विशेष म्हणजे दोन्ही तगडे उमेदवार अनुक्रमे सोलापूर शहर मध्य व माळशिरस येथून आमदार आहेत.
🔸सातारा : राजेंचा दरबार की शिंदेशाही
सातारा मतदारसंघात भाजपाने उदयनराजें भोसलें यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धडाडीचे नेते शशिकांत शिंदे यांच्यासमवेत होत आहे. या लढतीत राजे मतदारसंघ राखतात की, शशिकांत शिंदे याची शिंदेशाही अवतरती याकडे लक्ष लागले आहे.
🔸धाराशीव : भाऊबंधकीचा नवा अध्याय
धाराशीव लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजीत पवार) अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्याशी लढत होत आहे. येथे वंचितने सेवानिवृत्त पोलिस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांना उमेदवारी दिली आहे. अर्चना पाटील या माजीमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांच्या स्नुषा तर तुळजापूरचे भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत.
🔸रायगड : तटकरेची तटबंदी की गितेच अनंत
रायगड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार अनंत गिते यांच्याशी लढत होत आहे. येथे तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष झाल्याने नवा ट्विस्ट आला आहे. यामुळे तटकरे तटबंदी अभेद्य ठेवतात की गिते पुन्हा अनंतकाळ आपला हक्क प्रस्थापित करतात याकडे लक्ष लागले आहे.
🔸माढा : यंदा कुणाला पाडा
माढा कधी कुणाला ‘पाडा’ म्हणेल याचा नेम नाही असे अलिकडे म्हटलं जातं. इथं यंदा विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर भाजपाने पुन्हा विश्वास टाकला आहे. त्यांच्याविरुद्ध मोहिते घराण्यातील धैर्यशील मोहिते पाटलांनी शड्डू ठोकला आहे. विशेष म्हणजे गतवेळी निंबाळकराकडून केवळ ३६ हजार मतांनी पराभूत झालेले आ. संजयनमामा शिंदे यावेळी निंबाळकरासोबत आहेत हे विशेष. येथे दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस व विजयसिंह मोहिते पाटील यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
🔸रत्नागिरी सिंधुदुर्ग : राणे की राऊत
रत्नागिरी अन् सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्याचा मतदारसंघ असलेल्या या लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे भाजपाचे उमेदवार आहेत. तेथे त्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विनायक राऊत यांच्याशी लढत होत आहे. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी चारदा गुलाल प्राप्त केलेल्या या जागी २००९ मध्ये निलेश राणे विजयी झाले होते. तद्नंतर दोनदा पराभूत व्हावे लागले होते.
🔸लातूर : झाकली मूठ कोणाची
लातूर हा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी शिवाजीराव निलंगेकर, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचा जिल्हा. इथं मागच्या काही कालखंडात भाजपाने चांगलेच पाच रोवले होते. यातूनच गतवेळी सुधाकर श्रंगारे यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली होती. यंदा त्यांच्यासमोर कॉंग्रेसचे डॉ शिवाजी काळगे यांनी आव्हान निर्माण केले आहे. मात्र, लातुरकर आपली झाकलेली मूठ सहसा लवकर उघड करत नाहीत. यामुळे लढतीकडे कायम लक्ष राहते.
🔸सांगली : इथं आघाडी उलटी टांगली
सांगली लोकसभा मतदारसंघात थेट दुरंगी लढतीची अपेक्षा होती. इंडिया आघाडीत कॉंग्रेस या जागेवर जोरदार दावा करत होती. मात्र, जागेचा ‘किताब’ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या चंद्रहार पाटलाने पटकावला. यामुळे विशाल पाटलांनी बंडाचे निशाण फडकावले. परिणामी विद्यमान भाजप खासदार संजय पाटील, शिवसेने ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील व अपक्ष विशाल पाटील यांच्यात ‘दिल्ली केसरी’ कोण होतो याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.