मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
मुंबई – तीन दिवसांपुर्वी मुंबई येथील घाटकोपर भागातील एका पेट्रोल पंपावर वादळी पावसात होर्डिग्ज कोसळून झालेल्या अपघातात १६ निष्पाप व्यक्तींचा मृत्यू झाला होता. यातील मुख्य आरोपी भावेश भिंडे यास मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
दुर्घटना घडल्यानंतर पंतनगर पोलिस ठाण्यात इगो मिडिया प्रायव्हेट लिमिटेडचे प्रमुख भावेश भिंडे व अन्य काही व्यक्तिवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर तीन दिवसांपासून भावेश भिंडे हा फरार होता. अखेर मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा माग काढत उदयपूर शहर गाठले. येथे एका हॉटेलमध्ये अन्य नातेवाईकांच्या नावे रूम बूक करत वास्तव्य करत असताना पोलिसांनी त्यास गजाआड केल्याचे एका वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे
भावेश भिंडे यांनी अलिकडे मुंबईतील ‘होर्डिंग्ज’ क्षेत्रातील एक बडी हस्ती अशी आपली ओळख निर्माण केली होती. त्यांची यापूर्वीची ‘गुज्जू अॅड्स’ ही फर्म ब्लॅक लिस्टेड झाली तरी नव्याने ‘इगो मिडिया’ नावाची संस्था नावारूपास आणत रेल्वे, मुंबई मनपा यांची कंत्राटे मिळवली होती असे सांगण्यात येते.
सरसकट स्ट्रक्चरल ऑडीट
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा होर्डिग्जचे सरसकट स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय मुंबई सोडून अन्य शहरातील अधिकृत, अनधिकृत होर्डिग्जचा विषय ऐरणीवर आला आहे. मुंबईत १६ निष्पाप जिवांचे बळी गेल्यावर तरी यासंबंधी एखादे धोरण अंमलात यावे अशी मागणी जोर धरत आहे.