” घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेट्रोल पंप मालक भावेश भिडे आणि जाहिरात कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्या त आला आहे‘ “
मुुंबई: सोमवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) मुंबईला मोठा तडाखा बसला. घाटकोपर (Ghatkpor) इथे वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळलं. या अपघातातील मृतांची संख्य वाढली असून हा आकडा 14 वर गेला आहे तर 75 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एका गंभीर जखमीसह 43 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर 31 जखमींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बचावकार्य अजूनही सुरू आहे. आतापर्यंत 74 लोकांना वाचवण्यात यश आले आहे.
अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांनी या पेट्रोल पंपावर आसरा घेतला होता. मात्र त्याचवेळी पंपालगत उभारलेला एक अवाढव्य होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे थेट पेट्रोल पंपावर कोसळला. या होर्डिंगखाली तब्बल 80 वाहनं अडकल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर वेगाने सुरू झालं बचावकार्य… पेट्रोल पंप, सीएनजी पंप यामुळे हा संपूर्ण भाग ज्वलनशील असल्यामुळे इथे गॅस कटर वापरता येत नव्हता. 13 जणांचा मृत्यू राजवाडी रुग्णालयात आणि एका व्यक्तीचा मृत्यू सायनन रुग्णालयात झाल्याची माहिती घाटकोपर पोलिसांनी दिली आहे. जखमींना घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत सरकारने जाहीर केलीय. तर जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार आहे. . बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आलं आहे.
दुर्घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाहणी केलीये.. यावेळी घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांसाठी पाच लाख रूपयांच्या मदतीची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केलीये. तसेच या दुर्घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबईतल्या सर्वच होर्डिंग्जचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसंच अनधिकृत होर्डिंग्ज तातडीने हटवण्याचे आदेश दिलेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही घटनेची पाहणी करुन अपघाताची माहिती जाणून घेतलीये.