Devendra Fadnavis on Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या विधानामुळे महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच राजकीय खळबळ उडाली आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या दारुण पराभवावर भाजपकडून पहिल्यांदाच मोठी प्रतिक्रिया आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळेच आमचा पराभव झाला, असे वक्तव्य भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. फडणवीस यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच राजकीय खळबळ उडाली आहे.
दादांची मतं वळलीच नाहीत
एका टीव्ही चॅनेलच्या कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी झालेले देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभेच्या १२ जागा होत्या, ज्या आम्ही तीन ते सहा हजार मतांच्या फरकाने गमावल्या. एकूण मतांमधील तफावत पाहिल्यास महाविकास आघाडीच्या तुलनेत केवळ २ लाख मतं आम्हाला कमी मिळाली आहेत. कारण अजित पवारांची मतं आमच्याकडे हस्तांतरित (ट्रान्सफर) झाली नाहीत.
भाजपसाठी अजितदादा सोयीचे नव्हते
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपली मतं आमच्या बाजूने सहज वळवली, पण अजित दादांची मतं आम्हाला मिळू शकले नाहीत. राष्ट्रवादीची मतं मिळाली असती तर आमचा पराभव झाला नसता, असं फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या म्हणण्यानुसार, भाजप नेत्यांसाठी अजित पवारांसोबत युती सहज नव्हती, पण आता परिस्थिती सुधारली आहे. युती आवश्यक आहे हे सर्वांना माहीत आहे आणि भविष्यात आम्ही एकत्र काम करु, असेही ते म्हणाले.
पराभवानंतर पहिल्यांदाच जाहीर शल्य
लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या दारुण पराभवानंतर पहिल्यांदाच भाजपच्या वरिष्ठ नेत्याने या पराभवासाठी अजित पवार आणि त्यांच्या पक्षाला जबाबदार धरले आहे. याआधीही छोट्या-छोट्या नेत्यांनी अजित यांच्यावर निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आरएसएसशी संलग्न मॅगझिन ऑर्गनायझरने अजित यांच्यावर निशाणा साधला होता. अजित पवारांना सोबत घेतले नसते तर नुकसान कमी झाले असते, असे त्यात लिहिले होते. अजित पवारांना एनडीएमध्ये सामील करुन घेणाऱ्या नेत्यांवरही या मासिकाने निशाणा साधला होता.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती महाराष्ट्रात १७ जागांवरच अडली. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी भाजपकडे ९, शिवसेनेला सात, तर राष्ट्रवादीकडे एक जागा आहे.