Chinchwad Vidhan Sabha : एकाच घरातून दोघांना तिकीट मिळणे अशक्य आहे. त्यामुळे अश्विनी जगताप या वेगळा मार्ग निवडण्याच्या मनस्थितीत असल्याचे बोलले जात आहे.
पिंपरी चिंचवड : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे. लोकसभेच्या यशानंतर शरद पवार यांनी विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात आपले डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील महत्त्वाचा असणारा वडगाव शेरी मतदारसंघातील दिग्गज नेता शरद पवारांनी आपल्याकडे खेचून आणला. त्यानंतर आता चिंचवड विधानसभेमध्ये देखील मोठी घडामोडी घडणार असल्याचे पाहायला मिळत आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप या तुतारी हाती घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे देखील विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. एकाच घरातून दोघांना तिकीट मिळणे अशक्य आहे. त्यामुळे अश्विनी जगताप या वेगळा मार्ग निवडण्याच्या मनस्थितीत असल्याचे बोलले जात आहे.
पोटनिवडणुकीत विजयी
लक्ष्मण जगताप आमदारपदी असताना त्यांचे निधन झाल्यानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडली होती. त्यामध्ये अश्विनी जगताप यांना भरघोस मतांनी चिंचवडकरांनी निवडून दिले होते. मात्र आता पुन्हा एकदा चिंचवड निवडणूक पार पडणार आहे. त्यात लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यामुळे अश्विनी जगताप या वेगळा विचार करण्याची तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
…तर दीर-भावजयीत लढत
अश्विनी जगताप या जर ‘तुतारी’ हाती घेऊन लढल्या तर या मतदारसंघामध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार असून दीर आणि भावजय यांच्यामध्येच खरी लढत पाहायला मिळेल. मात्र याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. परंतु मतदारसंघामध्ये अश्विनी जगताप याच तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार हे चांगलेच ऍक्टिव्ह झालेले असून विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्वच मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यात पिंपरी चिंचवडमध्ये महत्त्वाच्या असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात डाव टाकण्याचा विचारात शरद पवार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत अश्विनी जगताप यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नसली तरी मतदारसंघातील चर्चा आता वाढू लागली आहे.