Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली. ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच असल्याची बोचरी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केलीय.
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दैनिक सामनाला लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं मुलाखत दिली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी लोकशाही, संविधान, शिवसेनेतील बंड, राज्यातील उद्योगधंदे दुसऱ्या राज्यात जाणं अशा अनेक मुद्यांवर भाष्य केलं. आता या मुलाखतीवरुन राज्याचे राजकारण तापले असून अनेक आरोप-प्रत्यारोप सध्या केले जात आहे. अशातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे यांच्या वर टीका करत थेट आव्हानच दिले आहे.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देशभरातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली. ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच असल्याची बोचरी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केलीय. यावेळी बोलताना बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान देत पाच प्रश्न उपस्थित केले. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर एक मुलाखत देऊन त्यांनी या प्रश्नांचीही उत्तरं द्यावीत, महाराष्ट्रातील जनता या उत्तरांची वाट पाहत आहे, असे खुले आव्हानच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एक्स वर एका पोस्टच्या माध्यमातून केले आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
शिवसेना पक्षात उभी फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रचाराने संपूर्ण महाराष्ट्रात पिंजून काढला आहे. निवडणुकांच्या काळात उद्धव ठाकरे मोठ्या हिंमतीने लढताना आणि पक्षाला उभारी देण्याचे काम करत आहे. त्याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ ला रोखठोक मुलाखत देऊन अनेक विषयांवर परखड मते मांडली. मोदींना आतापर्यंत महाराष्ट्राचे प्रेम मिळाले. आता महाराष्ट्राचा शाप काय असतो ते अनुभवा, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत दोन भागांत प्रसिद्ध होत आहे. मात्र, असे असताना भाजपने आता या मुलाखतीवरुन उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली आहे. उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊतांना मॅनेज मुलाखत दिली. उद्धव ठाकरेंची ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच असल्याचे बावनकुळे एक्सवरून म्हणाले.
हिंमत असेल तर….
पुढे बोलतांना त्यांनी पाच प्रश्न उपस्थित करत थेट आव्हानच उद्धव ठाकरेंना दिले आहे. उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान आहे की, हिंमत असेल तर एक मुलाखत देऊन त्यांनी या प्रश्नांचीही उत्तरं द्यावीत, महाराष्ट्रातील जनता या उत्तरांची वाट पाहत असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणले. आता उद्धव ठाकरे हे आव्हान स्वीकारतात का आणि बावनकुळे यांच्या टीकेला कशा पद्धतीने उत्तर देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत
- दहशतवादी कसाबचं समर्थन करणाऱ्या काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल तुमची भूमिका काय?
- १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटातील गुन्हेगार तुमच्या उमेदवाराच्या प्रचारात का होता?, हा देशद्रोही प्रचारात बघून तुम्हाला लाज वाटली नाही का?
- सत्तेवर आल्यास हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे. त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात?
- राहुल गांधी आणि काँग्रेसचे चेलेचपाटे सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात त्याबद्दल तुम्ही गप्प का आहात?
- उदयनिधी स्टॅलिन हा हिंदू धर्म संपवण्याची धमकी देतो आणि तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून का बसला होता?