महाविकास आघाडी (MVA)आणि महायुतीच्या (Mahayuti) पुणे जिल्ह्यातील (Pune news) उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
पुणे : महाविकास आघाडी (MVA)आणि महायुतीच्या (Mahayuti) पुणे जिल्ह्यातील (Pune news) उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला महाविकास आघाडीच्या बारामती, शिरुर आणि पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सुप्रिया सुळे (SunetraPawar), रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि अमोल कोल्हे यांनी अर्ज दाखल केला तर महायुतीच्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी दोन्ही आघाड्यांकडून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं शिवाय सभा घेत एकमेकांवर ताशेरेदेखील ओढले.
महाविकास आघडीचे शिरुर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अमोल कोल्हे, बारामती लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सुप्रिया सुळे आणि पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. हे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना पुण्यात मोठं शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी शरद पवार, सुषमा अंधारे, जयंत पाटील, प्रशांत जगताप, सचिन आहिर, होळकरांचे वंशज उपस्थित होते. यावेळी तिन्ही उमेदवारांनी आपलं धोरण सांगितलं. पुण्यात काय विकास केला हे मोहोळांना सांगता आलं नाही, असं रवींद्र धंगेकर म्हणाले. नटसम्राट, कार्यसम्राट परवडतो, पण खोके सम्राट, पलटूसम्राट परवडत नाही, असा अमोल कोल्हेंंनी हल्लाबोल केला तर आमची लढाई ही महागाई विरोधात आहे. कोणत्याही शुभकार्यात तुतारी वाजवली जाते. शुभसंकेत असलेलं चिन्ह मिळालं त्यामुळे राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. महाविकास आघाडीच्या सभेच मंचावर जागा नसल्याने तिन्ही उमेदवारांनी भर उन्हात बसून सभा ऐकली.
त्यासोबतच महायुतीच्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनीदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मी उमेदवारी अर्ज भरला असून महायुतीच्या सर्व पक्षांची मला साथ आहे या मुळे माझा विजय होउ शकतो असा असा विश्वास सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला. महायुतीकडूनदेखील मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, रामदार आठवले, प्रफुल्ल पटेल आणि आजी माजी आमदार आणि खासदार उपस्थित होते. बारामतीत यंदा इतिहास घडणार, सुनेत्रा पवार दिल्लीला जाणार न्हणजे जाणार, असा निर्धार देवेंद्र फडणवीसांनी केला. त्यासोबतच मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मत द्या, असं आवाहन अजित पवारांनी केलं तर अबकी बार सुनेत्रा पवार, असा नारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला आहे.