बदलापूर आंदोलन प्रकरणात पत्रकारांवरही गुन्हे
बदलापूरच्या पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांना गुन्हे शाखेची नोटीस
शाळेची तोडफोड केल्याच्या गुन्ह्यात नाव आल्यानं पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह…?
बदलापुरात चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर बदलापूरकरांनी शाळेबाहेर आंदोलन करत शाळेची तोडफोड केली होती. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात महिला पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांचं नाव आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आल्यानं पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. याप्रकरणात श्रद्धा ठोंबरे यांना गुन्हे शाखेनं अटक करण्याचा इशारा देत चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.
आंदोलनाच्या दिवशी सकाळपासून श्रद्धा ठोंबरे या संबंधित शाळेबाहेर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून वार्तांकन करत होत्या. मात्र आंदोलकांची संख्या वाढू लागताच श्रद्धा ठोंबरे यांना पोलिसांनी स्वतः गर्दीतून बाहेर काढलं. यानंतर एकीकडे संतप्त आंदोलकांनी रेलरोको केला, तर दुसरीकडे शाळेचीही तोडफोड करण्यात आली. यावेळी श्रद्धा ठोंबरे या सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांच्यासोबत शाळेच्या परिसरात होत्या. मात्र या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात श्रद्धा ठोंबरे यांचं नाव आरोपी म्हणून दाखल करण्यात आलं. श्रद्धा ठोंबरे यांनी हे अत्याचार चांगलंच उचलून धरलं होतं. मात्र यामुळं हे प्रकरण पोलिसांच्या अंगलट आल्यानं आता पोलिसांनी पत्रकारांनाच लक्ष्य करायला सुरुवात केल्याची चर्चा बदलापूरमध्ये आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.