भारत पशुधन प्रणालीवर नोंद घेणे बंधनकारक
कृषि प्रतिनिधी – तुमच्याकडे गाय, म्हैस असेल तर यापुढं त्यांचे ‘इयर टॅगिंग’ आता बंधनकारक राहणार आहे. काय हे? थोडक्यात माणसांचे जसे ‘आधार कार्ड’ तसेच हे समजा. यासाठी केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. राज्यातील सर्व पशुधनास ही ‘इयर टॅगिंग’ 1 जून 2024 पासून बंधनकारक राहणार आहे.
सर्व पशुवैद्यकीय संस्थेमार्फत पशुधनाच्या कानास बिल्ला लावून त्याची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करण्याची प्रक्रिया पशुवैद्यकीय संस्थांकडे सुरू आहे. यासंबंधी जिल्हाधिकारी यांना पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्याकरिता तसेच प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 च्या प्रभावी अंमलबजावणी करण्याचे अधिकार दिले आहे.त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पशुधनाची इयर टॅगिंग करून नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक आहे.
पशुधनांच्या कानाला बिल्ला नसेल तर?
▪️सर्व ग्रामपंचायती नगरपंचायत/ नगरपालिका यांनी 1 जून 2024 नंतर ईअर टॅगिंगशिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था/दवाखान्यामधून पशुवैद्यकीय सेवा देता येणार नाही.
▪️अधिनस्त कत्तलखान्यामध्ये टॅग असल्याशिवाय म्हैसवर्गीय पशुधनाची कत्तल करण्यास परवानगी देता येणार नाही.
▪️सर्व महसूल, वन, वीज महावितरण विभाग यांनी नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशुंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास इयर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम देता येणार नाही.
▪️कोणत्याही पशुधनाची वाहतूक इयर टॅगिंग असल्याशिवाय करता येणार नाही. तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदार यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
▪️परराज्यातून येणाऱ्या पशुधनास इयर टॅगिंग केल्याची व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेतल्याची खातरजमा तपासणी नाक्यावरील पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी हे करणार आहेत.
▪️पशुधनास इयर टॅग केलेले नसल्यास तपासणी नाक्यावरील पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या पशुधनास इयर टॅगिंग करून नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करावी लागणार आहे.
▪️1 जून 2024 पासून तसेच सर्व ग्रामपंचायत, महसूल विभाग इयर टॅगिंग नसलेल्या पशुधनाची बाजार समिती,आठवडी बाजार व गावागावातील खरेदी विक्री व बैलगाडा शर्यती करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
जबाबदारी कोणाची?
पशुधनाच्या मालकी हस्तांतरणा बाबतच्या नोंदी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून त्वरित अद्यावत करून घेण्याची जबाबदारी संबंधित पशुपालकाची राहील.
तर दाखला नाही!
ग्रामपंचायतीमध्ये पशुंच्या विक्री किंवा हस्तांतरणाचा/परिवर्तनाचा दाखला पशुधनाची इयर टॅगिंग असल्याशिवाय/ झाल्याशिवाय तो देण्यात येऊ नये. तसेच दाखल्यावर इयर टॅगिंग झाल्याशिवाय तो देखील देण्यात येऊ नये. दाखल्यावर
अशी असेल प्रक्रिया
या प्रणालीमध्ये पशुधनास करण्यात आलेल्या इयर टॅगिंग अंतर्गत बारा अंकी कोड व बारकोडची नोंद घेण्यात येत आहे. यामध्ये जन्म मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार, वंध्यत्व, उपचार व पशुपालकास नोंद हस्तांतरण या सुविधांचा समावेश आहे. त्यांच्या पशुधनाच्या पशुधनाची कोणाच्या नावे नोंद आहे, प्रजनन, आरोग्य,जन्म मृत्यू इत्यादी माहिती उपलब्ध होते. सर्व पशुधनाच्या कानात बिल्ला( टॅग) लावून त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीमध्ये करणे अत्यावश्यक आहे