अंबाजोगाई – येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या अपघात विभागात रविवारी (दि.२१) दोन गटात तुफान हाणामारी झाली. अचानक सुरू झालेल्या या हाणामारीमुळे रुग्ण, डॉक्टर आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांत प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. स्वा.रा.ती रुग्णालयाच्या अपघात विभागात बहुतांशी वेळेस अत्यवस्थ रुग्ण असतात. रविवारी देखील अनेक रुग्णांवर या ठिकाणी उपचार सुरू होते. त्याच वेळी ही घटना झाली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मंगळवार पेठेत सुरू असलेल्या आनंद नगरीत रविवारी सायंकाळी सदर बाजार आणि बारभाई गल्लीतील तरुणात वाद झाला. यावेळी एका तरुणाला मारहाण करण्यात आली. त्यानंतर जखमी तरुण स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी गेला असता त्या ठिकाणी या दोन्ही भागातील तरुणांमध्ये पुन्हा मोठा वाद सुरू झाला. या वादाचे पर्यावसन तुफान हाणामारीत झाले. या तरुणांना अपघात विभाग सारख्या संवेदनशील ठिकाणी गोंधळ घालू नये याचेही भान राहिले नाही. चक्क अपघात विभागात घुसून एकमेकांवर खुर्च्या फेकत त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. यावेळी रुग्ण, डॉक्टर आणि कर्मचारी जीव मुठीत धरून एका बाजूला जाऊन बसले. किमान पाऊणतास हा धुडगूस सुरू होता. अखेर रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करत जमाव शांत केला. या घटनेमुळे स्वाराती रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.