Ajit Pawar Jan Sanman Yatra Junnar: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजित पवारांच्या नेतृत्वात जनसन्मान यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा आज जुन्नरमध्ये
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजित पवारांच्या नेतृत्वात जनसन्मान यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा आज जुन्नरमध्ये पोहोचली आहे. यात्रेनिमित्त अजित पवार देखील जुन्नमध्ये दाखल झाले. याठिकाणी अजित पवारांना मात्र महायुतीतील घटक पक्षातील कार्यकर्त्यांच्या निषेधाला सामोरे जावे लागले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली आहे.
घटक पक्षांना डावललं जात असल्याचा आरोप
जुन्नर हा पर्यटन तालुका असताना शासकीय कार्यक्रम घेऊन घटक पक्षांना डावललं जात असल्याचा आरोप आंदोलकांकडून केला जात आहे. यामध्ये भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा अजित पवारांवर विशेष रोष आहे. यामुळे जनसन्मान यात्रा जुन्नरमध्ये दाखल होताच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचके यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली आणि निषेध नोंदवला. अजित पवारांनी घटक पक्षांना डावलले आहे, असा आरोप आशा बुचकेंसहित त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. अजित पवारांचा ताफा नियोजित बैठकीच्या दिशेने जात असताना त्याच मार्गावर आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान आशा बुचके यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, अजित पवार चोरून बैठका घेत आहेत. प्रचार सभांचा गैरवापरही करत आहेत. पर्यटन संदर्भात काही काम करत असताना सर्वांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. परंतु आम्हाला डावलून बैठका घेतल्या जात आहेत. जर अजित पवारांना हे मान्य नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावे. याच्याशी माझा काही संबंध नाही, असे अजित पवारांनी स्पष्ट सांगावे. तर पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना सध्या ताब्यात घेतले आहे.
शिंदे गटाचाही बैठकीवर बहिष्कार
दरम्यान आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या महायुतीच्या बैठकीवर शिवसेना शिंदे गटाने बहिष्कार टाकला आहे. जनसन्मान यात्रेदरम्यान अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे माझी लाडकी बहीण असे नामकरण करुन अजित पवार गटाकडून चुकीचा प्रसार करण्यात येत आहे, यामुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. परिणामी शिवसैनिकांनी महायुतीच्या या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे.