कळंब :- उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून आ. कैलास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले असताना प्रतिस्पर्धी महायुतीमध्ये मात्र भावींची स्पर्धा टोकाला गेली आहे. या धामधुमीतच वंचित बहुजन आघाडीने तांदुळवाडीचे तरुण सरपंच अॅड प्रणित शामराव डिकले यांची उमेदवारी जाहीर करून उमेदवार निश्चितीच्या बाबतीत आघाडी घेतली आहे.
धाराशिव शहर, ग्रामीण भागातील ५० गावासह कळंब शहर व तालुक्यातील सर्व गावांचा समावेश असलेला उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ खुला आहे. यामुळे येथील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असते. सध्या या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास बाळासाहेब घाडगे पाटील हे करत आहेत.
या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार कैलास पाटील यांची उमेदवारी निश्चित असून त्या अनुषंगाने त्यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे मात्र प्रतिस्पर्धी महायुतीचा उमेदवार कोण ? महायुतीमध्ये जागा शिवसेना, राष्ट्रवादी की भाजप यांच्याकडे? हा फैसला सध्यातरी भावींच्या भाऊगर्दीमुळे अनिर्णित असाच आहे.
यास्थितीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी निश्चितीच्या बाबतीत अग्रक्रम राखला असून जाहीर केलेल्या आपल्या तिसर्या यादीत उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघासाठी अॅड प्रणित शामराव डिकले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
कोण आहेत प्रणित डिकले?
प्रणित शामराव डिकले हे कळंब शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तांदुळवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच आहेत. मराठवाडा सरपंच परिषदेचे ते संघटक आहेत. त्यांचे वडील शामराव डिकले हे तालुका खरेदी-विक्री संघाचे अनेक वर्षे अध्यक्ष होते व तांदूळवाडी गावचे दोन दशकांहून अधिककाळ सरपंचपद भूषवले होते.