मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यापासून अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमधून बाहेर पडेल, अशी जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. भाजप (BJP) आणि शिंदे गट जाणीवपूर्वक अजितदादा गटाची कोंडी करत आहे. जेणेकरुन अजित पवारांनी (Ajit Pawar) स्वत:हून महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा, यादृष्टीने रणनीती आखण्यात आल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात होती. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या आमदारांना निवडणुकीच्या तोंडावर महामंडळाचे अध्यक्षपद देऊन त्यांची नाराजी शमवण्याचे प्रयत्न सुरु झाले होते. शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांना सिडको तर भरत गोगावले यांना एसटी महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना काहीच न मिळाल्याने अजित पवार नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे अजित पवार यांची वाटचाल महायुतीमधून बाहेर पडण्याच्या दिशेने सुरु आहे, या चर्चेला आणखीनच बळकटी मिळाली आहे. मात्र, आता नव्याने समोर आलेल्या माहितीमुळे या सगळ्या घटनाक्रमात एक ट्विस्ट आला आहे.
अजित पवार यांचे विश्वासू सहकारी सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना केंद्रात एक महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस कमिटीच्या चेअरमनपदी सुनिल तटकरे यांची वर्णी लागली आहे. या समितीमध्ये एकूण 31 सदस्य असतात. यापैकी 21 लोकसभा आणि 10 राज्यसभेचे सदस्य असतात. पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस संबंधित एखादा विषय सभागृहात चर्चेला येणार असेल तर ही समिती त्या विषयाची तपासणी करणे. त्याचा अहवाल सभागृहाला सादर करण्याची जबाबदारी या समितीवर असते. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्यामुळे सुनील तटकरे यांचे राजकीय वजन नक्कीच वाढणार आहे. मात्र, अजित पवार यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास सुनील तटकरे यांना देण्यात आलेले समितीचे अध्यक्षपद कायम राहणार का, हेदेखील पाहणे औत्स्युक्याचे ठरेल.
अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाबाबतची मनातील सल पुन्हा बोलून दाखवली
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पु्न्हा एकदा मुख्यमंत्रीपदाबाबतची मनातील सल पुन्हा बोलून दाखवली होती. नितीशकुमार यांच्याप्रमाणे उपमुख्यमंत्रीपदाचा विक्रमही तुमच्याकडे आहे. मुख्यमंत्री व्हावे असे कधी वाटते का? या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, “मुख्यमंत्री बनायचं आहे. पण आमची गाडी तिथेच उपमुख्यमंत्रीपदावर अडकली आहे, त्याला काय करायचं. मी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, पण संधी मिळत नाही”, असे अजित पवार यांनी सांगितले होते.