दरवर्षी मोठ्या उत्साहात बैल पोळ्याचा सणा साजरा केला जातो. यावर्षी 02 सप्टेंबरला सोमवारी (आज) बैलपोळ्याचा सण साजरा केला जाणार आहे. पाहुयात बैल पोळ्याचे महत्व.
Loksanvad Vrutta : दरवर्षी श्रावण अमावस्या दिवशी बैल पोळा (Bail Pola) साजरा केला जातो. या दिवसाला पिठोरी अमावस्या देखील म्हणतात. पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नांगरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हा बैल पोळ्याचा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रासह , विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगणा सीमाभागात सुद्धा हा सण साजरा होतो. यावर्षी 02 सप्टेंबरला सोमवारी (आज) बैलपोळ्याचा सण साजरा केला जाणार आहे. दरम्यान, बैलपोळ्याचा सण नेमका का साजरा केला जातो? शेतकऱ्यांच्या दृष्टीनं बैलपोळ्याचं महत्व काय? याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत.
बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण
आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी बैल पोळ्याचे महत्व अजूनही कायम आहे. शेतकर्यासोबत वर्षभर शेतात राबणार्या बैलांचा एकमेव सण पोळा श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. ज्यांचेकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते. ओढा वा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात.
बैलाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटलं जातं
शेतकऱ्यांच्या दृष्टीनं बैल पोळ्याला विशेष महत्व आहे. बैल हे वर्षभर शेतात राबतात. शेतकऱ्यांना बैलांची साथ असते. म्हणून बैलाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटलं जातं. बैल हा शेतकऱ्यांच्या आयुष्याशी जोडलेला होता. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. बैलपोळा हा बैलांच्या सन्मानाचा सण आहे. महाराष्ट्राच्या काही भागात हा सण दोन दिवस साजरा केला जातो. बैलपोळा म्हणजेच पहिल्या दिवसाला मोठा पोळा आणि दुसर्या दिवसाला लहान मुले लाकडाचे नंदीबैल सजवितात याला तान्हा पोळा म्हणून साजरा केला जातो.
बैल पोळा पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार प्रभू विष्णू हे कृष्णाच्या रुपात धर्तीवर अवतरले होते, तेव्हापासून कृष्णाचे मामा कंसने कृष्णाचे प्राण घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एकदा कंसाने कृष्णाचा वध करण्यासाठी पोलासूर नावाचा राक्षस पाठवला होता. तेव्हा कृष्णाने त्याचा वध केला. तो दिवस श्रावण अमावास्येचा होता. या दिवशी पोळा सण साजरा करण्यात येतो.