कळंब(प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यात उगम पावलेली मांजरा नदी पाटोदा, बीड,केज तर धाराशिव जिल्ह्यातील वाशी,कळंब तालुक्यातून पश्चिम पूर्व दिशेने प्रवाहित आहे.उगमस्थान असलेल्या भागात मुसळधार पाऊस झाल्याने नदीला महापूर आला आहे.नदी काठी असलेल्या अनेक गावांना धोक्याचा इशारा दिला आहे.नदी लगत असलेल्या शेतातील पिकात महापुराचे पाणी गेल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.तर मांजरा धरण यावर्षी अशीच परिस्थिती राहिली तर शंभर टक्के भरणार या आशा पल्लवित झाल्या आहेत.
धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मांजरा नदीला उगम क्षेत्रात असलेले प्रकल्प भरभरून वाहत आहेत.सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सर्वत्र मोठा पाऊस सुरू आहे.त्यामुळे गेल्या आठवड्या भरात तीन वेळा या नदीला महापूर आलेला आहे.नदी लगत असलेल्या शेतात महापुराचे पाणी मोठ्या प्रमाणात गेल्याने पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.
पेरणी,फवारणी,कोळपणी करून पीक काढणीच्याच प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्याला या महापुराचा फटका बसला आहे.
तर या नदीवर असलेला मांजरा प्रकल्प मात्र यावेळी शंभर टक्के भरणार अशी आशा सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे.