सोलापूर:- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण आणि भाजपाचे तरूणतुर्क नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सोलापूर येथे भेट झाली आहे. नुकतेच भाजपात दाखल झालेले कॉंग्रेस नेते बसवराज पाटील पण या भेटी दरम्यान सोबतीला होते. यामुळे एकीकडे ‘महाविकास’ आघाडी विरूद्ध ‘महायुती’ असा सामना रंगात येत असतानाच दुसरीकडे उमरगा, लोहारा, औसा तालुक्यात प्रभाव असलेला नेता गळाला लावण्याची मोहीम फत्ते झाल्यानंतर भाजपाचा तुळजापूर – धाराशीव तालुक्यात प्रभाव असलेला मोठा नेत्यांवर डोळा असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अणदूर ता. तुळजापूर येथील सुपूत्र माजी आमदार मधुकर चव्हाण हे प्रामुख्याने काँग्रेसचे मराठवाडय़ातील सगळ्यात जुने नेते. शुभ्र धोतर, शुभ्र नेहरू असा पेहराव असलेलं मधुकरराव चव्हाण एक कायम जमिनीवर पाय असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जाते. प्रदीर्घ काळ कॉग्रेस पक्षात सक्रीय काम केले, तरूण नेता ते एक ज्येष्ठ नेता या त्यांच्या प्रवासात मतदारसंघातील गाव न् गाव अन् खडा न् माहिती असलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
वयाचे अमृतमहोत्सवी वर्ष पार केल्यानंतरही ते मतदारसंघाचा झंझावाती दौरा करतात, अगदी लग्न, अंत्यसंस्कार, कौटुंबिक कार्यक्रमासही हजेरी लावतात अशी त्यांची ख्याती. एकूणच वयाने ज्येष्ठ असले तरी मनाने तरूण अन् खंबीर असलेल्या या मधुकरराव चव्हाणांनी यामुळेच कधी शेतकरी कामगार पक्षाला तर कधी शिवसेना भाजपाच्या आव्हानाला कडवी झुंज दिली.
मधुकरराव चव्हाण हे १९९९ पासून २०१९ पर्यंत सलग चारवेळा तुळजापुरातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. १९९० ते १९९५ या दरम्यानही ते आमदार होते. १९९५ मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते माणिकराव खपले यांच्याकडून चव्हाणांचा पराभव झाला होता.
धाराशिव मधूनही तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते डॉ.पद्मसिंह पाटील यांच्याकडून ते पराभूत झाले होते. 2019 साली तुळजापूर मतदारसंघातून आठव्यांदा ते मैदानात उतरले होते, मात्र भाजपचे उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात काँग्रेस कडून पंचायत समिती सदस्यापासून झाली.
मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अनेक वर्ष अध्यक्ष, लोकल बोर्डाचे सभापती, भूविकास बँकेचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात दुग्धविकास व पशूसंवर्धनमंत्री, विधानसभेचे उपसभापती, अशी अनेक पदे त्यांनी भूषविली आहेत. शुभ्र धोतर आणि नेहरू सदरा अशा पेहरावातील अन् पहाडी आवाजातील या नेतृत्वाचे यामुळेच अनेकांना अप्रूप वाटते .
यापूर्वी च्या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांच्याशी त्यांची जवळीक राहिलेली आहे, मात्र परवा ओमराजे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मधुकरराव चव्हाण यांची अनुपस्थिती होती, काल झालेल्या फडणवीस यांच्या भेटीमुळे अनेक चर्चाना उधाण आले आहे, आता चव्हाण काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.