माणुसकीला आणि मनुष्यजातीला काळिमा फासणाऱ्या चौकशीचे प्रयोग !
तेजस पाटील:- अकोट जि. अकोला
एकीकडे न्यायव्यवस्था वारंवार बजावते “प्रत्येक आरोपी गुन्हा सिद्ध होई पर्यंत निर्दोष असतो” तर सध्या आपल्याकडे “प्रत्येक संशयित आरोपी, निर्दोष सिद्ध करेपर्यंत गुन्हेगारच” त्यासाठी निकाल लागेपर्यंत त्याला समाजातून जगण्याची अशाच राहू नये,असे विविध प्रकारे अन्याय होत असतांना सर्रास दिसत आहे.
यातील ही तळपायाची आग मस्तकात पोहचवणारी घटना घडली आहे.
चक्क आरोपीला चौकशी दरम्यान अमानुष पणे पार्श्वभागात दांडा घालून छळ करण्यात आला,त्यात त्याचा मृत्यू सुद्धा झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
तब्बल दोन महिने अकोला पोलिसांनी हे प्रकरण दडवून ठेवल्याचं समोर आलंय. संशयित आरोपीस क्रूरपणे मारणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह एका पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे.
दोन महिन्यांपूर्वी एका गुन्ह्यातील आरोपाखाली संशयित म्हणून अकोट शहर पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं. यादरम्यान पोलिसांकडून त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. अकोट पोलिसांनी त्याच्या पार्श्वभागात दांडा टाकून त्याला क्रूर मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या अंगावर गंभीर जखमा झाल्यात. यासोबतच त्याच्या छातीची हाडं तुटलीत.
त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्याला एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा दुसऱ्याच दिवशी दुर्दैवी मृत्यू झाला. ‘गोवर्धन हरमकार’ असं या मृत व्यक्तीचे नाव आहे. तो अकोट तालूक्यातील सुकळी गावाचा रहिवाशी आहे. तो अतिशय गरीब कुटुंबातील आहे.
गंभीर मारहाणीत गोवर्धनच्या छातीची हाडं तुटली. गंभीर अवस्थेत असलेल्या गोवर्धनला एका बाहेरील व्यक्तीच्या मदतीनं पोलिसांनी अकोटमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं. त्या दवाखान्यानं उपचारास नकार देत त्याला अकोट ग्रामीण रुग्णालयात पाठवायचा सल्ला दिला. अकोट ग्रामीण रुग्णालयाने त्याची गंभीर परिस्थिती पाहून पुढील उपचारासाठी त्याला अकोला जिल्हा रूग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र जवरेच्या सांगण्यावरून त्याला अकोला जिल्हा रूग्णालयात भरती न करता पोलिस कारवाईच्या भितीने अकोल्यातील एका खाजगी रूग्णालयात त्याला भरती करण्यात आलं.
मारहाणीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 जानेवारीला उपचार दरम्यान मृत्यू झाला. गोवर्धनच्या प्राथमिक एक्स-रे आणि वैद्यकीय कागदपत्रांनुसार त्याच्या छातीची हाडं तुटली होती असा आरोपही मृत गोवर्धनच्या नातेवाईकांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
१५ जानेवारीच्या दिनक्रम असा राहिला
मृत गोवर्धन यांचे काका सुखदेव हरमकार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एका गुन्ह्याच्या आरोपाखाली अकोट शहर पोलिसांतील पीएसआय राजेश जवरे’ आणि इतर तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी 15 जानेवारी रोजी पुतण्या गोवर्धन याला ताब्यात घेतलं. त्यानंतर 16 जानेवारीला त्याला त्याच्या सुकळी या गावात आणत घरझड़ती घेतली. त्यावेळी पोलिसांच्या हाती काहीच लागलं नव्हतं.
पुढे पोलिसांनी गोवर्धनसह त्याचे सध्या तक्रारदार असलेले त्याचे काका सुखदेव यांनाही ताब्यात घेतलं. 16 जानेवारीला रात्री आठ ते नऊ वाजतादरम्यान दोघांनाही पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. इथं दोघांनाही अमानुषपणे मारहाण करण्यात आली. या मारहाणीत सुखदेव हरमकार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यानंतरही पोलिसांकडून मृत गोवर्धनला अमानुषपणे मारहाण सुरूच होती. एवढ्यावरच न थांबता पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे आणि त्यांच्या साथीदारांनी मृतक गोवर्धनच्या पार्श्वभागात दांडा टाकून क्रूरतेचा कळस गाठला.
प्रकरण दाबण्याचा प्रयत्नात अंत्यसंस्कार अकोला येथेच केले
गोवर्धनचं निधन झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली. त्याचे कुटुंबीय अकोल्यात आल्यानंतर त्यांनी मृतदेह गावी नेण्याचा आग्रह केला. मात्र त्यांना धमकावत त्यांच्याकडून आमची परिस्थिती नसल्यामुळे आम्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करू शकत नसल्याचं जबरदस्तीने लिहून घेण्यात आलं. त्यानंतर अकोल्यात गरीब आणि अनोळखी मृतदेहावर अंत्यसंस्कार करीत असलेल्या संस्थेशी संपर्क साधून अकोल्यातील मोहता मिल स्मशानभूमीत मृतदेहाला अग्नी देण्यात आला. गावात अंत्यसंस्कार झाले असते तर प्रकाराचा बोभाटा झाला असता म्हणून अकोल्यात घाईघाईत गोवर्धनवर अंत्यसंस्कार करवून घेतल्याचं बोललं जात आहे.
शवविच्छेदनात धक्कादायक खुलासे
गोवर्धन याच्या मृत्यूप्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसात मर्ग दाखल करण्यात आला असून वैद्यकीय अहवालात मृत्यूचं कारण आतापर्यंत समजू शकल नाही. मात्र प्राथमिक अहवालात गोवर्धन याच्या अंगावर मोठ्या प्रमाणात जखमा आढळून आल्या. अशी माहिती आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांनी दिली आहे. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी अद्याप याप्रकरणी गंभीर भूमिका घेतली नाही. अखेर कुटुंबियांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे धाव घेतली. आता या प्रकरणात चौकशी समिती गठित झाली आणि पुढील चौकशी पोलीस करत आहेत.
भारतात पोलिस चौकशी दरम्यान मृत्यूचे प्रमाण चिंताजनक.
मागील पाच वर्षांमध्ये नोंदणी झालेले मृत्यू म्हणजेच उघडकीस आलेले मृत्यूची संख्या ६६९.
राज्यसभेत विचारल्या गेलेल्या प्रश्नावर केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या लेखी उत्तरात नमूद माहितीनुसार १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२२ पर्यंतचा हा आकडा आहे.
गुजरात हे पोलीस कस्टडीत मृत्यूच्या आकड्यांमध्ये देशात अव्वल राज्य.
चक्क लगातार पाच वर्षे गुजरात राज्य सतत देशात अव्वल राहिले. मागील पाच वर्षात एकट्या गुजरात मध्ये ८० मृत्यू हे पोलीस कस्टडी मध्ये झाले आहेत.त्या पाठोपाठ महाराष्ट्र ७६,उत्तर प्रदेश ४१,तमिळनाडू ४०,बिहार ३८.
हे सगळे आकडे जरी इतके धक्कादायक वाटत असले तरीसुध्दा हे फक्त उजेडात आलेले आहेत.
देशात सध्या इन्स्टंट न्याय पाहिजे जनतेला,त्यात फेक एन्काऊंटर करून स्वतःच न्याय करून देणारे गैरप्रकार होतात.
यात मारला गेलेला खरच आरोपी गुन्हेगार सिद्ध न होताच केस बंद होतात हा न्यायिक प्रक्रियेत अत्यंत चुकीचा पायंडा होत चालला असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया समाज माध्यमातून येत असल्याच पहायला मिळत आहे.