धाराशीव…
कळंब तालुक्यातील आंदोरा व इटकूर सज्जाचे तलाठी कल्याण शामराव राठोड यांना ४ हजार रुपयांची लाचेची मागणी करून, तडजोडीअंती ३ हजार रूपयांची लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवले म्हणून लाच लुचपत विभागाने कारवाई केली आहे.
यासंदर्भात अधिक वृत्त असे की या प्रकरणातील तक्रारदार हे आंदोरा येथील रहिवासी आहेत. त्यांच्या भावाच्या नावे खरेदी केलेल्या जमिनीच्या फेरफारची नोंद घेण्यासाठी नोटीस काढून नोंद घेण्याकामी तलाठी राठोड यांनी ४ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. यानंतर तडजोडीअंती ३ हजार स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
याची लाच लुचपत विभागाने पडताळणी करत तलाठी कल्याण शामराव राठोड यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करत ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. या प्रकारामुळे महसूल विभागातील लाचखोरीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.
तलाठी कल्याण राठोड हे मूळचे बीड जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या आंदोरा ता कळंब येथे नियमित तलाठी आहेत. याशिवाय मोठा सज्जा असलेल्या इटकूरचा अतिरिक्त पदभार पण त्यांच्याकडेच आहे. ही कारवाई धाराशीव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार इ. पु. शेख यांच्या सापळा पथकांने केली आहे.